महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी खासगी रुग्णालयात १०० तर शासकीय रुग्णालयात ५० खाटा राखीव ठेवण्यात याव्यात असे आदेश योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत शासकीय व खाजगी रूग्णालयांतील कोरोना संदर्भातील सद्यस्थितीचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. जिल्हाधिकारी उदय चौधरी महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोविड रूग्णालयामध्ये महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत खाटांची संख्या वाढवण्यावर भर द्यावा जेणे करून अधिकाधिक गरजू लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल.
एमआयडीसीमध्ये लिक्वीड ऑक्सीजन निर्मितीसाठी एका महिन्यात प्लांट उभारता येईल का जेणेकरून ऑक्सिजनची कमतरता भरून निघेल याबाबतही चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी जुलै महिना अखेर पर्यंत महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत खाजगी रूग्णालयात १०० तर शासकीय रूग्णालयात ५० खाटांची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती दिली. शहरात आज घडीला साडेसहा हजार अँटीजेन टेस्ट झाल्या असून सर्वेक्षणामुळे रूग्णाचे निदान आणि रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे चौधरी यांनी यावेळी सांगितले.














